मध्य रेल्वेचे आरपीएफ जवान – खरे हिरो – हरवलेली लहान मुले शोधण्यात व जीव वाचवण्यात आघाडीवर

मध्य रेल्वेचे आरपीएफ जवान खरे हिरो हरवलेली लहान मुले शोधण्यात व जीव वाचवण्यात आघाडीवर

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत हरवलेली/पळून गेलेली मुले शोधून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात, तसेच ऑपरेशन जीवन रक्षक अंतर्गत प्रवाशांचे प्राण वाचवण्यात उल्लेखनीय कार्य केले आहे.

ऑपरेशन नन्हे फरिश्ते

ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत आरपीएफने हरवलेली किंवा पळून गेलेली मुले शोधून त्यांना त्यांच्या पालक/पालकांकडे सोपवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

एप्रिल ते मे 2025 या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफने सरकारी रेल्वे पोलीस (GRP), इतर रेल्वे कर्मचारी व चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने एकूण 235 मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले. याआधी 2024 मध्ये ह्याच कालावधीत 149 मुले वाचवली गेली होती. एप्रिल 2025 मध्ये 114 मुले, व मे 2025 मध्ये 121 मुले वाचवण्यात आली, तर एप्रिल 2024 मध्ये 56 व मे 2024 मध्ये 93 मुले वाचवली गेली होती.

घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या झगमगाटामुळे अनेक मुले घरातून निघून रेल्वे स्थानकांवर येतात. प्रशिक्षित आरपीएफ जवान या मुलांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांना पालकांकडे परत जाण्यासाठी समुपदेशन करतात. अनेक पालकांनी या सेवेसाठी मनापासून आभार मानले आहेत.

ऑपरेशन जीवन रक्षक

आरपीएफचे जवान रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याबरोबरच प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे कामसुद्धा तत्परतेने करत असतात.

धावत्या गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरतानाचा धोका अनेक वेळा प्रवाशांच्या दुर्लक्षामुळे वाढतो, अशा प्रसंगी आरपीएफ जवानांनी तत्काळ कृती करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

एप्रिल-मे 2025 मध्ये, आरपीएफने 12 प्रवाशांचे (9 पुरुष व 3 महिला) प्राण वाचवले, तर याच कालावधीत 2024 मध्ये 7 प्रवाशांचे (5 पुरुष व 2 महिला) प्राण वाचवले होते.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या शूर जवानांचे कार्य सुरक्षा, सतर्कता आणि सेवा या तत्त्वांवर आधारित आहे. त्यांनी आपली कर्तव्ये निष्ठेने, सजगतेने व धैर्याने पार पाडली आहेत.